मकरसंक्रांत
जानेवारी महिना सुरू झाला की, प्रत्येकाला वेध लागतात मकर संक्रांतीचे. वर्षातील पहिला सण असल्याने प्रत्येक जण हा सण उत्साहात साजरा करतो. एकमेकातील मतभेद, हेवेदावे दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रेमाचा गोडवा पसरवणे. त्यामुळे वर्षाची सुरुवातच गोड व्हावी यासाठी संक्रांतीत ‘तीळगूळ घ्या..गोड गोड बोला’ बोलण्याची पद्धत रुजली.मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीलामकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दि,वसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मकर रास ही दहाव्या भागात येते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातॊ. पंजाबमध्ये ’माघी’, मध्य प्रदेशात ’सुक्रांत’, दक्षिण भारतात ’पोंगल’, उत्तर प्रदेशात ’किचेरी’, या नावाने ओळखला जातॊ. परंतु तीळाचे महत्व मात्र सगळीकडे सारखे आहे. मकर संक्रांत १४ किंवा १५ जानेवारीला येते हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
१४ जानेवारी आणि संक्रांतीचा संबंध नाही
आपले सर्व सणवार हे तिथींवर अवलंबून असतात. मग मकर संक्रांत १४ जानेवारी रोजीच कशी येते यामागची उत्सुकता प्रत्येकाला लागून असते. मुळात १४ जानेवारी आणि संक्रांतीचा संबंध नाही. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यापासून ते पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे आणि १० सेकंद एवढा कालावधी लागतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार शतकपूर्तीच्या अंकात ४००ने भाग जात नसेल तर त्यावर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर ४०० वर्षानी निरयन मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच ९ मिनिटे १० सेकंद हा काळ साठत जाऊन १५७ वर्षानी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. सन २०००मध्ये मकर संक्रांती २२ डिसेंबर रोजी आली होती. १८९९ साली ती १३ जानेवारी रोजी आली. १९७२पर्यंत संक्रांती १४ जानेवारी रोजी येत असे. १९७२पासून २०८५ सालापर्यंत निरयन मकर संक्रांत कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारी रोजी येईल. तर २१०० सालापासून निरयन संक्रांत १६ जानेवारी रोजी येईल. अशा रितीने पुढे सरकत जाऊन सन ३२४६ साली निरयन मकर संक्रांत १ फेब्रुवारी रोजी येणार आहे. खरी मकर संक्रांत ही सूर्य जेव्हा सायन मकर राशीत जातो तेव्हा असते. म्हणजे संक्रांत २१-२२ डिसेंबर रोजी येते. तेव्हापासून भारतात दिनमान वाढत जाते. पण आपल्याकडील पंचागे निरयन पद्धतीचे असल्यामुळे संक्रांत आपण सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केल्यापासून मानतो.
आनंदाचा सण
संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. पूर्वीच्या काळी विजेची सोय नसायची. त्यामुळे शेतकरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कामे करायचा. संक्रांतीच्या दिवसात दिनमान वाढत असल्याने काम करण्यासाठी अधिक संधी मिळते. त्यामुळे हा सण आनंदाचा सण मानला जातो. ‘फरगिव्ह अॅण्ड फरगेट’ हा संदेश या दिवसानिमित्त दिला जातो.
भोगी, संक्रांत, किंक्रांत
संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा लज्जतदार पदार्थाचा खास बेतही असतो. भोगीच्या दुस-या दिवशी मकर संक्रांत असते. या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. सुगडात गहू, उसाचे तुकडे, हळकुंड, भुईमुगाच्या शेंगा, पैसे, बोरं आदी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. संक्रांतीनंतरचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. संक्रांती देवीने संक्रांतीच्या दुस-या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले. त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले. दक्षिण भारतात हा दिवस मट्ट पोंगल म्हणून साजरा करतात.
भ्रष्टाचार, अंधश्रद्धा राक्षसांचा वध करा
संक्रांतीबाबतीत पौराणिक कथाही आहेत. शंकरासुर नावाचा राक्षस जनतेला त्रास द्यायचा. या राक्षसाचा वध करण्यासाठी परमेश्वराने देवी संक्रांतीचे रूप घेतले आणि राक्षसाचा वध करत जनतेची सुटका केली. या कथेमागचा मूळ उद्देश म्हणजे आजच्या काळात प्रत्येकाने देवीचे सामर्थ्य स्वत:मध्ये निर्माण करणे आहे. सद्यस्थितीत भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, आळस, अनिती या राक्षसांनी थैमान घातले असून त्यांचा प्रत्येकाने वध करायला हवा.
काळ्या रंगाच्या वस्त्राचे परिधान
संक्रांतीच्या दिवसात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा पडली. यामागेही शास्त्रीय कारण आहे. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शरीर उबदार राहते.
तीळसंक्रांत
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.
0 comments:
Post a Comment